Madhya Pradesh Unadkya blog by Kedar Bhide
जवळ जवळ दोन वर्षे कोविड साथीच्या निर्बंधांमुळे फार कुठे फिरायला जाता आले नाही. डिसेम्बर २०२१ मध्ये मी आणि बहिणीने मध्य प्रदेशला जाण्याचे ठरवले. पूर्वी कधीतरी महेश्वर येथील घाटाचे छायाचित्र पहिले होते तेव्हापासूनच महेश्वरला जायचे मनात होते. तशी संधी प्राप्त होताच आम्ही इंदोर, ओंकारेश्वर, महेश्वर, मांडू अशी योजना ठरवली. इंदोर शहर विमानाने मुंबईशी आणि रेल्वे तसेच बसने मुंबई-पुणे या दोन्ही शहरांशी जोडलेले आहे. तसेच नाशिक येथून ३५० किमीवर आग्रा महामार्गाला लागूनच महेश्वर आहे.
इंदोर ( Indore) :
डिसेम्बर मधल्या एका थंड गार वारे सुटलेल्या सकाळी आम्ही विमानाने इंदोरला पोहोचलो. विमानतळापासून हॉटेल पर्यंत जाईस्तोपर्यन्त शहराचे जे दर्शन घडले त्यातून सर्वात स्वच्छ शहर या कीर्तीला साजेसे असे विशेष काही दिसले नाही.
उत्तरेतील मराठी साम्राज्याच्या सत्ताविस्तारात महत्वाचे योगदान असलेल्या होळकर घराण्याची राजधानी म्हणजे इंदोर. या संस्थानाचे संस्थापक मल्हारराव होळकर (१६९६-१७६६) यांचा जन्म जेजुरीजवळ होळ या गावचा. मल्हाररावांनी देशभरात लढायात सहभाग घेतला. त्यांचे पुत्र खंडेराव यांच्या पत्नी म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. खंडेराव होळकर यांचा कुंभेरी येथील वेढ्यात तोफेचा गोळा लागून मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी तत्कालीन प्रथेप्रमाणे सती जाण्यास निघाल्या असता मल्हाररावांनी त्यांना सती जाण्यापासून रोखले आणि कारभारात
लक्ष घालण्यास सांगितले. अहिल्याबाईनी त्यांचे ऐकून पुढे १७९५ पर्यंत इंदोर संस्थानाचा कारभार पहिला.
याच होळकर घराण्याचा प्रासाद म्हणजे राजवाडा पॅलेस. दुपारी विश्रांती घेतल्यावर आम्ही राजवाडा पॅलेस बघायला निघालो. भव्य प्रवेशद्वार, बाजूने जाणारे दोन रस्ते, आजूबाजूच्या जुन्या इमारती, अरुंद गल्ल्या पाहून शनिवारवाडा आणि आजूबाजूच्या परिसराची आठवण होते.
राजवाड्यात सुशोभीकरणाचे काम सुरु होते. आत देवघर, तुळशीवृंदावन, तसेच एक छोटे प्रदर्शन पाहण्यासारखे आहे. देवघरात विठ्ठल-रखुमाईची मूर्ती मराठी जनांना ओळखू येईल. त्यानंतर आम्ही आमचा मोर्चा सराफा बाजारकडे वळवला. अर्थात ती वेळ जरा लवकर असल्याने अजूनही खाण्याची दुकाने तितक्या संख्येने लागली नव्हती. तसेच तिथला गडबड गोंधळ पाहून तिथे फार वाट पाहण्याचीही आमची इच्छा होईना.
त्यानंतर आम्ही कृष्णपुरा छत्री या जवळच असलेल्या स्थळास भेट दिली. होळकर घराण्यातील व्यक्तींच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेल्या या वास्तू आहेत. बांधणी आणि कलाकुसर सुंदर आहे, जागाही सावलीची आहे.
सराफ बाजारला भेट द्यायला आल्यावर हे स्थळ पाहावेच असे आहे. तरीही काहीसे दुर्ल्क्ष झाल्यामुळे आत धुरळा पसरलेला होता. सराफ बाजारातील गजबजाट मागे सोडून आम्ही छप्पन दुकानला संध्याकाळी भेट दिली. छप्पन दुकान म्हणजे इंदोरच्या काहीशा नवीन भागात असलेले सराफा बाजाराचे आधुनिक रूप. एकाच रेषेत खाद्यपदार्थांचे ५६ गाळे आणि समोर मोकळी जागा, गाड्यांचा त्रास नाही. त्यामुळे तिथे विविध पदार्थ खाऊनच आमचे रात्रीचे जेवण
झाले.
ओंकारेश्वर (Omkareshwar) :
इंदोर पासून ९० किमी अंतरावर ओंकारेश्वर आहे. हा प्रवास दुसऱ्या दिवशी आम्ही बसने केला. मध्य प्रदेशात आपल्यासारखी परिवहन व्यवस्था नाही, मात्र अनेक खासगी बस सेवा दिवसभर उपलब्ध असतात. या गाड्यांचे वेळापत्रक आणि निघण्याचे ठिकाण याची माहिती नीट उपलब्ध नाही. त्यामुळे मध्य प्रदेशात बसने प्रवास करताना दुसऱ्या दिवशीच्या बसची आधीच व्यवस्थित चौकशी करून ठेवली पाहिजे. इंदोर मधून थेट बसने ओंकारेश्वरला
आल्यावर बस स्टँडच्याकडेलाच आम्ही पोहे आणि पराठ्यावर ताव मारला. मध्य प्रदेशात सर्वत्रच मोठ्या परातीत पोहे विकायला ठेवलेले असतात. जरा गोड असतात तसेच स्वस्त आणि गरम असल्यामुळे आम्हाला आवडले.
ओंकारेश्वर हे नर्मदेच्या दक्षिण तीरावर असलेले ठिकाण नर्मदेचे खोल दरीतून खळाळून वाहणारे रूप दाखवते. ओंकारेश्वर गावासमोरच नर्मदेत मांधाता हे एका डोंगराच्या रूपात असलेले मोठे बेट आहे.
ओंकारेश्वर गावात मामलेश्वराचे सुंदर देऊळ आहे. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर मांधाता बेटावर असून बेटाला दोन पादचारी पूल ओंकारेश्वर गावाशी जोडतात. दोनही पुलावरून आणि छोट्या छोट्या घाटांवरून दरीतून वाहणाऱ्या नर्मदेचे आणि त्यात फिरणाऱ्या होड्यांचे सुंदर दृश्य दिसते. मांधाता बेटाला पायी प्रदक्षिणा करता येते, मात्र आम्हाला वेळेअभावी जमले नाही. तसेच मांधाता बेटाला नर्मदेतून होडीद्वारेही प्रदक्षिणा करता येते असे स्थानिकांनी सांगितले. मात्र मांधाता बेटाला जोडणाऱ्या आणखी एका मोठ्या पुलाचे बांधकाम सुरु असल्याने जवळच्याच ओंकारेश्वर धरणातून नदीत पुरेसे पाणी सोडले जात नव्हते, त्यामुळे होडीतूनही आम्हाला प्रदक्षिणा जमली नाही. दुपारनंतर आम्ही थेट नर्मदेच्या पात्रात जाऊन तिथे पाण्यात पाय सोडून गार वाऱ्याची मजा घेतली.
महेश्वर (Maheshwar) :
नर्मदेच्या उत्तर तीरावर वसलेले एक छोटे शहर म्हणजे महेश्वर. कधीतरी महेश्वर येथील घाटाचे चित्र पहिले होते तेव्हापासून तिथे जाण्याची फार इच्छा होती. ओंकारेश्वर येथून थेट महेश्वरला जाणारी बस फारच लांबून जाते. त्याऐवजी ओंकारेश्वर ते बडवाह (इंदोरला जाणारी बस) आणि मग बडवाह ते महेश्वर असा प्रवास करावा.
महेश्वर तिथे विणल्या जाणाऱ्या साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच नर्मदेवर अतिशय सुंदर घाट तिथे आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी इंदोर संस्थानची राजधानी १७७२ मध्ये महेश्वर येथे हलवली. त्यांच्याच कारकिर्दीत महेश्वर येथे राजवाडा, मंदिरे, नदीवर प्रशस्त घाट बांधले. मराठी इतिहासातील या कर्तृत्ववान राज्यकर्तीने आपला देह ठेवला तोही याच ठिकाणी. अहिल्या फोर्ट या नावाने परिचित असलेल्या किल्ल्यातील अहिल्येश्वर मंदिर आणि त्या समोरील होळकर घराण्यातील छत्री यांच्यावरील कलाकुसर सुंदर आहे.
ओंकारेश्वर येथे खळाळून वाहणारी नर्मदा पाहिल्यावर संथ वाहणारी नर्मदा इथे पाहायला मिळते. महेश्वरच्या घाटाची आणि शांत नर्मदेची मजा अनुभवण्यासाठी घाटाच्या जवळपासच्या हॉटेल मध्ये राहणे, खासकरून अहिल्या फोर्टच्या आत असलेल्या ठिकाणी राहणे जास्ती चांगले. हॉटेल राज पॅलेस किंवा रेवा रेसिडेन्सी नक्की पहा. फक्त या फोर्ट भागात खाण्याचे जरा प्रश्न आहेत. महेश्वर शहरातील रेस्टोरंट्स फोर्ट भागात घरपोच सेवा देतात आणि हॉटेल्स मध्ये चौकशी केल्यावर त्याची माहिती मिळते.
महेश्वर येथे प्रशस्त घाट आणि अनेक देवळे, अहिल्याबाई राहत असलेला वाडा, ज्याचा काही भाग हॉटेल मध्ये रूपांतरित झालेला आहे, महेश्वरी साड्या विणण्याचे ठिकाण अशा वस्तू फोर्ट भागातच आहेत. दुपार, संध्याकाळ, अगदी रात्रीही घाटावर लोकांची ये जा सुरु असते आणि केव्हाही तिथे फिरणे, नदीच्या काठावर शांतपणे बसणे फार छान वाटते. अहिल्येश्वर मंदिर आणि समोरच होळकर घराण्यातील व्यक्तीच्या स्मरणार्थ असलेले मंदिर या महत्वाच्या वास्तू आणि तिथूनच घाटावर उतरणाऱ्या प्रशस्त पायऱ्या ही घाटावरची प्रसिद्ध स्थळे आहेत.
महेश्वरचा हा घाट दक्षिणाभिमुख आहे. त्यामुळे घाटावर बसून दक्षिणेकडे झुकलेल्या सूर्याचा उदय आणि अस्त यांचा सुंदर देखावा आम्हाला पाहायला मिळाला.
मांडू (Mandu) :
महेश्वर पासून ४० किमी वर आणि एका पठारावर वसलेले हे स्थळ महेश्वर येथून एका दिवसात पाहून येण्यासारखे आहे. खरेतर हा एक मोठा गिरीदुर्गच आहे. वरती राहण्या खाण्याच्या सोयी मर्यादित आहेत आणि प्रेक्षणीय स्थळे एकमेकांपासून दूर असल्याने तिथे राहणे सोयीचे नाही. महेश्वर येथील आम्ही राहत असलेल्या हॉटेल मालकांनी चालकासह गाडी भाड्याने देण्याचे मान्य केले त्यामुळे आमचे काम सोपे झाले. त्यामुळे महेश्वर येथे राहून मांडू येथे
जाऊन परत येणे सोयीचे आहे. तसेच इंदोर-धार-मांडू असे बसनेही येण्याचे शक्य असल्याचे आम्हाला मांडू येथे दिसलेल्या बसेस वरून वाटते.
अनेक शतके परमार घराण्याच्या अधिपत्याखाली असलेला हा दुर्ग १४०१ पासून माळवा सुल्तानशाहीच्या अधिपत्याखाली आला. माळवा सुल्तानशाहीतील राजधानी धार येथून मांडू येथे हलवण्यात आली. पुढे जाऊन हा दुर्ग मुघल आणि नंतर मराठ्यांच्या ताब्यात आला. येथील वास्तू ह्या मुख्यत्वेकरून माळवा सुल्तानशाहीच्या काळातील आहेत.
मांडू येथील नीलकंठ महादेव मंदिर नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांचा एक टप्पा आहे. त्यामुळे मांडूच्या पठारावर जाताना परिक्रमा करणारे लोक दिसत राहतात. मंदिराजवळच झऱ्यातून पाणी वाहत असते. मंदिरानंतर आम्ही रूपमती पॅव्हिलिअनकडे वळलो. उंचावर टेहळणीसाठी योग्य जागी असलेलया या ठिकाणाहून निमार मैदानाचे सुंदर दृश्य दिसते. जवळच बाजबहादूरचा महाल आहे. पुढे जामी मशीद आणि त्याच्यामागे असलेला होशंगशहाची कबर ही स्थाने मांडूच्या बाजारातच आहेत. जामी मशिदीचे उंच घुमट आणि त्यांना तोलून धरणारे चौकोनी खांब सुंदर आहेत. मागेच होशंगशहाची पांढऱ्या संगमरवरात बांधलेली कबर आहे.
मांडू येथील महत्वाची आकर्षणे म्हणजे जहाज महाल आणि हिंदोला महाल. दोन्ही महाल एकमकांपासून जवळच आहेत. दोन तलावांच्या मध्ये निमुळत्या जागेत जहाज महाल बांधलेला आहे. या महालाच्या छतावरून आणि खिडक्यांमधून तलावांचे सुंदर दृश्य दिसते. जवळच हिंदोला महालाच्या उताराच्या भिंती सुंदर दिसतात आणि त्या महालातील सभागृह भव्य आणि उंच छत असलेले आहे. मांडू येथील या सर्वच वास्तू सुंदर आहेत आणि संपूर्ण दिवस हे सर्व पाहताना लागतो.
संध्याकाळी महेश्वरला परत येताना महेश्वर जवळच्याच सहस्रधारा या ठिकाणाला भेट दिली. मात्र नदीत पुरेसे पाणी नसल्याने खडकांतून वाहणाऱ्या सहस्रधारांचे दर्शन आम्हाला झाले नाही. संध्याकाळी परत आल्यावर पुन्हा एकदा महेश्वरच्या घाटावर गेलो. तिथे कितीदा गेले तरी मन भरत नाही. दुसऱ्या दिवशी महेश्वर येथून पुन्हा आम्ही बसने इंदोर आणि मग रेल्वेने मुंबई असा प्रवास केला, आणि आमच्या मध्य प्रदेश सहलीची सांगता झाली.
सर्व छायाचित्र माझ्या बहीण, वैभवी भिडेच्या कॅमेऱ्यातून.
NOTE :
COVID-19 Related Government Imposed Restrictions Prevail At A Few Locations.
For More Details Get In Touch With Us At [email protected] Or Call Us At +91-9420213309
Scheduled Tours :
Batch No. | Date | Starting Point | Occupancy |
---|---|---|---|
Follow us on :
- Facebook : www.facebook.com/unadkya
- Instagram : www.instagram.com/unadkya
- YouTube : www.youtube.com/unadkya
- Twitter : www.twitter.com/unadkya