कुर्डूगड(Kurdugad) आणि मानगड(Mangad) करायचा ठरवले तेव्हा आमच्या ग्रुप मधले सर्व तयार झाले होते, अचानक २ आठवडे मी स्वतः व्यस्त असल्याने हा प्लॅन मी विसरलो होतो, २५ला मी आणि अनिल गडगडा ट्रेक करून आलो, तेव्हा सुद्धा काही मनात नव्हते की पुढच्या आठवड्यात हा ट्रेक करायचा आहे. नाही-हो म्हणत म्हणत कुठला दुसराच प्लॅन कागदावर आला पण अचानक ५ जण जमल्याने पुन्हा तेच २ किल्ले – कुर्डूगड(Kurdugad) आणि मानगड(Mangad) करायचे ठरवले. 

काही जण म्हणत होते रात्री निघूया पण आमचा नेहमीचा रथसारथी असीम दुसऱ्या मोहिमेवर असल्याने त्याला रात्री निघणं शक्य नव्हते त्यामुळे सकाळीच ठाणेवरून निघायचे ठरवले… आमच्या नेहमीच्या ग्रुप मधले ५ जण कुणाल, हेमेश,अनिल, प्रथमेश आणि मी होतो. उरलेले ३ जण अनिलच्या ओळखीचे होते. ६ वाजता ठाणेेवरून निघालो होतो पण बाकीच्यांना पिकअप करत करत जुईनगरलाच 7 वाजले नंतर असीमने जी गाडी पळवली त्याला तोड नाही…

पालीला नाश्ता करून आम्ही थेट १० वाजता पायथ्याचे गाव उंबर्डी गाठले. जिते गावातून सुद्धा एक वाट कुर्डूवाडीत जाते पण ती जास्त चढणीची आणि वेळखाऊ होती म्हणून आम्ही उंबर्डी गावातून गड चढायला घेतला. शाळेच्या बाजूने एक रस्ता ओढ्याकडे जातो. तिकडे वाटेतच पुरातन शिव मंदिराचे अवशेष आणि विरगळी पाहायला मिळतात,तिथूनच २-३ घरे लागतील.. शेवटच्या घरजवळूच वाट सरळसोट कुर्डूवाडीत जाते.. वाटेत जाताना विजेचे खांब तुम्हाला कुर्डुवाडीपर्यंत साथ देतात…

काहींना मिसळपाव खाल्याचा त्रास जाणवत होता त्यात दुपारचे रणरणते त्यात अजून भर घालत होते,मध्ये मध्ये दाट झाडी होती, पण शेवटी व्हायचे तेच झाले ज्योतीला पित्ताचा त्रास होऊन उलट्या झाल्या, थोडावेळ थांबावे लागले.. सर्वांच्या मनात धाकधूक झाली की तिला ट्रेक तर कॅन्सल करावा तर लागणार नाही ना?? पण थोड्याच वेळात तिला फ्रेश वाटल्याने आम्हाला हायसे वाटले..थोड्या आणलेल्या काकड्या खाऊन आम्ही सर्व पुन्हा वाटेला लागलो..

थोड्याच वेळात दीड तासांनी आम्ही कुर्डुवाडी गाठली… कुर्डुवाडीतुन आता किल्ला आता पूर्ण दिसत होता, कुर्डूगड(Kurdugad) एवढ्या तळपत्या उन्हात एवढा सुंदर दिसत होता की कोणीही बघातच क्षणी त्याच्या प्रेमात पडेल, कुर्डुवाडी म्हणजे पराक्रमी सरदार येसाजी कंकचे जन्मस्थान…

कुर्डूगडला विश्रामगड(Vishramgad) असे सुद्धा दुसरे नाव आहे, शिवरायांच्या साथीतले दुसरे पराक्रमी सरदार बाजी पासलकर यांचे आवडते विश्रांतीचे ठिकाण म्हणजे कुर्डुवाडी म्हणून या गडाला विश्रामगड(Vishramgad) असा सुद्धा म्हणतात, दुसरा विश्रामगड(Vishramgad) हा म्हणजे नाशिक जिल्ह्यातला पट्टा किल्ला, तिथे शिवाजी महाराजांनी विश्रांती घेतली होती म्हणून तो सुद्धा विश्रामगड(Vishramgad)…

सुंदर असा कुर्डुगड(Kurdugad) आणि पायथ्याला कुर्डुदेवीचे मंदिर

मार्च महिन्याचा सूर्य चांगलाच आग ओकत होता, कुर्डुवाडीत बाहेर एका झाडाखाली पाण्याची टाकी लावली होती तिकडे सर्वांनी आपला गळा ओला करून घेतला आणि गड चढायला घेतला. कुर्डुदेवीचे मंदिर येऊन पाहूया यावर सर्वांचे एकमत होऊन मार्गस्थ झाले. वाट स्पष्ट असून कुठेही चुकण्याची शक्यता नव्हती.

अवघ्या ५ मिनिटात आम्ही गडाच्या भग्न दरवाजाजवळ पोहचलो बाजूला पाण्याची स्वच्छ टाकी होती. याच पाण्याच्या टाकीतील पाणी खाली कुर्डूवाडीतलं टाकीत आणले होत. दरवाजानंतर एक निमुळती वाट पुढे वरती घेऊन जाते. किल्ल्याची बऱ्यापैकी दरड कोसळून हानी झाली होती. वरतून मोठे मोठे दगड कोसळून वाट अवघड झाली होती सर्वप्रथम आम्ही मागच्या बाजूला गेलो तिकडे एक टाके सुकून पडले होते आणि बाजूलाच एक लांबलचक 5 फूट उंच गुहा तयार झाली होती.

गुहा पाहून आम्ही मागे फिरलो आणि पुन्हा डाव्या बाजूच्या तश्याच दुसऱ्या गुहेकडे आलो ही गुहा सुद्धा तशीच लांबलचक आणि ६ फूट उंच होती. दोन्ही या नैसर्गिक गुहा राहण्याजोग्या नव्हत्या. गुहा पाहून आम्ही पुढे तुटलेल्या बुरुजाकडे वळालो.. बुरुजाला चढायला अजून पायऱ्या शाबूत होत्या. नंतर आम्ही आमचा मोर्चा कोकण खिडकीकडे वळवला, जराश्या चढावर होती ही खिडकी.

कोकण खिडकी म्हणजे कुर्डुगडाच्या सुळक्याचे भले मोठ-मोठे दगड कोसळल्याने एक पंचकोनी खिडकी तयार झाली होती, तिथून खाली कोकणचे सुदंर दृश्य दिसते म्हणून तिला कोकण खिडकी असे संबोधतात. जपून खाली उतरल्यावर आम्ही पुन्हा गुहेकडे आलो..

आम्हाला किल्ल्यावर असलेल्या हनुमानाची मूर्ती सापडत नव्हती. बरीच शोधाशोध केल्यावर आम्हाला ती सापडली. चपेटदान स्वरुपातील हनुमंताची मूर्ती अतिशय सुरेख होती. ती पाहून आम्ही गड उतरायला घेतला, तिथेच अनिलला कळाले त्याच्या फोनचा कपाळमोक्ष झाला आहे. मोबाईलच्या काचेला तडे गेले होते.

१० मिनिटात आम्ही कुर्डुदेवीच्या मंदिराजवळ पोहचलो. मंदिर म्हणजे एक लहानशी शाळा होती. अतिशय स्वच्छ आणि टापटीप. अवघ्या ४ विद्यार्थ्यांसाठी एवढी तंगडतोड करून शिकवण्यासाठी येणाऱ्या शिक्षकाला मानाचा मुजरा. नाहीतर शहरातले पांढरपेशी मुजोर शिक्षक.

मंदिराच्या बाहेर काही वीरघळ ठेवल्या होत्या.. त्यात गजलक्ष्मीची झिजलेली मूर्ती होती. तश्या बाकीच्या विरघळीसुद्धा झिजलेल्या अवस्थेतच होत्या. सर्व पाहून आम्ही पुन्हा कुर्डूवाडीत आलो तिथे टाकीतले पाणी भरून उतरायला सुरवात केली.

उतरताना मी पुढे होतो. अचानक ज्योती साप साप ओरडायला लागली. ती माझ्या मागेच चालत असल्याने माझा चुकून पाय तर पडला नसेल ना हा विचार करून मी थोडीशी पुढे धूम ठोकली..नंतर कळलं की तो बिनविषारी मांडूळ साप (Sand Boa Snake) होता. त्याला त्याच्या वाटेला जायला दिले आणि आम्ही आमच्या मार्गाला लागलो.

बाकीचे संथ गतीने उतरत होते म्हणून कंटाळा येत होता, दुपारचे 3 वाजले होते, जेवण मानगडलाच करूया असा सर्वांनी ठरवले, मी GPS चालू केला आणि मानगड च्या दिशेने मार्गस्थ झालो.

निजामपुरमार्गे रायगड(Raigad) – पाचाड(Pachad) रस्ता पकडला.. मशिदवाडी हे मानगड(Mangad)चे पायथ्याचे गाव होते, कुर्डुगडावरून अर्ध्या तासात आम्ही मानगड(Mangad) जवळ पोहचलो, रस्त्यावर दुर्ग प्रतिष्ठानने व्यवस्थित मार्गदर्शक फलक लावल्याने तशी गुगलची गरज पडत नाही.

४ वाजले होते, मानगड(Mangad)च्या समोरच्या घरातच आम्ही जेवणासाठी पथारी मांडली, घरातल्या आजीने सुद्धा आम्हाला बसायला चटई, सर्वाना थाळ्या, दोन हंडे भरून पाणी आणून दिले. आजींना ट्रेकर्स लोकांची सवय होती म्हणून सारख्या हे आणून देऊ का, ते आणून देऊ का असा सारखा चाललं होते, आम्ही आमचे जेवण लगेच आटपले आणि गडाच्या दिशेने निघालो.

वाट अतिशय सोपी होती आणि दिशादर्शक फलक लावले असल्याने शोधायची किटकीट नव्हती, अवघ्या ५ मिनिटांत आम्ही किल्ल्यावर पोहचलो समोरच देवीचे मंदिर होते आणि बाजूला काही अवशेष होते, मंदिर रात्री राहण्यासाठी योग्य आणि स्वच्छ होते. बाजूलाच गडाच्या माथ्यावर जायला वाट होती.

समोरच किल्ल्याचा  मुख्य दरवाजा दिसत होता. दरवाज्याने वरती आल्यावर तुम्हाला समोरच हनुमानाची मूर्ती दिसेल आणि डाव्या बाजूला धान्य कोठार दिसेल. दिवसभरात एक सुद्धा ग्रुप फोटो काढला नव्हता. त्याचे सोपस्कार पाडून आम्ही गडफेरीला लागलो.

गुहेच्याबाजूने छोटासा (अनावश्यक) लहान पॅच चढून वरती आलो (दुसऱ्याबाजूने किल्ल्यावर जायला पायऱ्या आहेत). वरती वाड्याचे चौथरे आणि उध्वस्त मंदिराचे अवशेष पाहयला मिळतात. एकाबाजूला दोन कोरड्या टाक्या देखील आहेत. पुढे चालत गेल्यावर आम्हाला चोर दरवाजा दिसला. तो पाहून झाल्यावर आम्ही बालेकिल्ला उतरायला घेतला.

एक बाजूला तुम्हाला पाण्याची 6 टाक्या दिसतील. त्यातील 3 टाक्या तुम्ही सहज पाहू शकता परंतु बाकीच्या टाक्या पाहण्यासाठी तुम्हाला द्राविडीप्राणायाम घालावा लागतो. बाकीचे कोणी तयार नव्हते. मग नेहमीप्रमाणे मी आणि कुणाल ते धाडस करयाचा विचार केला आणि त्या टाक्यापर्यंत पोहचलो. अगदीच आडमार्गावर टाक्या खोदल्या होत्या, त्या पाहून वरती आलो. नंतर अनिल व निंबाळकर सुद्धा टाक्या पाहायला गेले. ते येताच किल्ला उतरायला घेतला, अवघ्या 10 मिनिटात गावात पोहचलो. 

मानगड किल्ला(Mangad Fort)

मशिदवाडीतील पुरातन शिव मंदिर पाहयला निघालो, वाटेतच एक घरसदृश्य मंदिरासमोर अनिलला एक विरगळ दिसली, ती दूरवरून वीरगळ वाटत नव्हती तरीही कुतुहलाने आम्ही तिकडे गेलो आणि ती चक्क विरगळच होती, ज्योतीने मंदिराच्या दुसऱ्या बाजूला जाताच ‘युरेका युरेका’ अश्या अविर्भावतच सर्वांना बोलवून घेतले.

पाहतो तर काय तिकडे चक्क लागोपाठ 23 विरगळी मांडून ठेवल्या होत्या, विरगळी सुस्थितीत होत्या, जणू आम्हाला काही खजिना भेटल्याप्रमाणे आम्ही सर्व आनंदित झालो. फोटो वैगरे काढून आम्ही हाकेच्या अंतरावर असणाऱ्या भग्न शिव मंदिराजवळ पोहचलो.

मंदिराच्या चौथऱ्यावर भग्न शिवपिंड आणि नंदी सोडून अजून काही अवशेष नव्हते, बऱ्यापैकी अंधार वहायला आला होता,आम्ही सुद्धा आम्हीची गाडी मुंबई दिशेकडे दामटवली, 4 वाजताच जेवण केल्याने गाडी मधे न थांबवताच ठाणेला 10.00 वाजता पोहचलो.

(जाताना कुर्डुगड(Kurdugad) : मुंबई – खालापूर – पाली – नांदगाव – कडपे – जिते – उंबर्डी

मानगड(Mangad) : उंबर्डी – निजामपूर – मशिदवाडी – माणगाव – मुंबई येताना )

सहभाग : कुणाल कदम, हेमेश तांडेल, अनिल शिरसाठ, प्रथमेश शिरीबावकर, ज्योती घनावट, सुरेश निंबाळकर, हृदय धाडवे, प्रणव मयेकर.

NOTE :

COVID-19 Related Government Imposed Restrictions Prevail At A Few Locations.
For More Details Get In Touch With Us At [email protected] Or Call Us At +91-9420213309

Scheduled Tours :

Batch No.DateStarting PointOccupancy

Follow us on :

(Note : This Blog was originally published on http://invisiblepranav.blogspot.com/2018/02/blog-post_28.html )

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *