Mahabalipuram Unadkya blog by Kedar Bhide

डिसेंबर २०१९ मध्ये काही कामानिमित्त चेन्नईला जाण्याचा योग आला. माझ्याबरोबर काका काकू आणि माझी बहीण असे आम्ही चौघांनी प्रवास केला . कामानंतर २ दिवस चेन्नई शहर आणि आणखी एखादे ठिकाण पाहावे अशा विचाराने मी गेलो होतो. ते जवळचे ठिकाण म्हणून आम्ही महाबलीपुरम निवडले .

महाबलीपुरम(Mahabalipuram) चेन्नई पासून सुमारे ५० किमी दक्षिणेला आहे आणि चेन्नई शहरातून बंगालच्या उपसागराला समांतर असा पूर्व किनारी महामार्ग (ईस्ट कोस्ट रोड) आपल्याला थेट महाबलीपुरमला घेऊन जातो. ऑक्टोबर २०१९ मध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारतभेटीवर आले होते. त्याचवेळी त्यांनी महाबलीपुरमला भेट दिली. चीनचे अध्यक्ष हेलिकॉप्टरमधून प्रवास करत नाहीत त्यामुळे शी जिनपिंग चेन्नईहुन रस्त्यानेच महाबलीपुरम येथे गेले. याच कारणास्तव असावे, आम्ही २ महिन्यांनी प्रवास केला तेव्हा पूर्व किनारी मार्ग अतिशय उत्तम स्थितीत होता .

आम्ही चेन्नई-महाबलीपुरम हा प्रवास टॅक्सिने केला. महाबलीपुरम एक गावच आहे. तिथे बस-स्थानक आहे. तिथे गेल्यावर दिसले कि चेन्नई शहरातून जाणाऱ्या राज्य परिवहन आणि शहरी वाहतूक व्यवस्थेच्या गाड्या आहेत. योग्य चौकशी करून यांचा वापर होऊ शकतो. याचे मुख्य कारण असे महाबलीपुरम येथील प्रेक्षणीय स्थळे एकमेकांच्या जवळ आहेत आणि चालायच्या अंतरावर आहेत. गाडीचा फारसा उपयोग तिथे पोहोचल्यावर झाला नाही. केवळ पंचरथ हे ठिकाण बस स्थानकापासून साधारण १ किमी वर आहे .

डिसेम्बर हा पूर्व किनारी प्रदेशात पावसाचा महिना आहे. जाताना रस्त्यावर पाऊस पडता होता पण उरलेल्या दिवसाभरात पावसाने आमच्यावर कृपा केली आणि दिवस तसा चांगला गेला.

आकृती १ मध्ये दाखवल्याप्रमाणे महाबलीपुराम(Mahabalipuram) येथील प्रेक्षणीय स्थळे २ भागात विभागलेली आहेत. डावीकडे एका चौकोनात एका टेकडीवर लेणीसमूह (खरेतर लेणी ऐवजी अमुक मंडपम, तमुक मंडपम अशी नावे आहेत) आणि दीपगृह आहेत. उजवीकडे शोअर टेम्पल या नावाने दिसणारे किनाऱ्यालगत सुंदर देऊळ आणि त्याचे आवार आहेत. पंचरथ हे ठिकाण इथून पुढे दक्षिणेला १ किमीवर
आहे. आम्ही तिथे गेलो मात्र पावसामुळे आम्हाला काही नीटपणे बघता आले नाहीत.

इतिहास :

महाबलीपुरम या ठिकाणाचा उल्लेख इसवी सनाच्या सुरुवातीपासूनच उपलब्ध आहे. टॉलेमि या ग्रीक नकाशाकाराने या ठिकाणाचा उल्लेख एक बंदर म्हणून केलेला आहे. आज इथे दिसणारी ऐतिहासिक स्थळे पल्लव राजवटीतील असून यांचे काम इसवी सनाच्या सातव्या – आठव्या शतकात झाले. कांचीपुरम, तामिळनाडू येथे राजधानी असलेल्या पल्लवांसाठी महाबलीपुरम हे एक महत्वाचे बंदर होते.

स्थलवर्णन :

Krishnamantapa
Krishnamantapam

आपण आधी टेकडीवरील समूहातील काही लेण्यांची आणि दीपगृहाची माहिती पाहू आणि मग शोअर टेम्पलकडे वळू. पिवळ्या पांढऱ्या रंगाच्या टेकडीवर पसरलेली लेणी पाहताना दोन तास सहज जातात.

कृष्णमंडपम – आकृती २. कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून धरला आहे . त्याच्या छायेत गाई गुरे, गोप-गोपिका यांनी आसरा घेतला आहे. गोपिकेच्या डोक्यावर मडकीही दिसत आहेत.

Mahabalipuram

अर्जुनाची तपस्या – आकृती ३. सर्वात प्रसिद्ध आणि भव्य असे शिल्प म्हणजे अर्जुनाची तपस्या. कृष्णमंडपाच्या जवळच हे शिल्प आहे. या मोठ्या शिल्पात अनेक देव, मनुष्य आकृती, विविध पशू आहेत. एक पाय वरती घेऊन आराधना करणारा साधू , त्याच्या बाजूला चतुर्भुज शंकर, खाली एक छोटेसे देऊळ, त्याला नमस्कार करणारे उपासक, हत्ती सिंह, हरीण नाग इत्यादी जितके पाहावे तितके कमी आहेत.

Varaha mantapa

वराह मंडप – आकृती ४. पृथ्वीला उचलून धरलेला वराह अवतार , हत्ती आणि बाजूला सेविका अशा रूपात असलेली गजलक्ष्मी , आणि सिंह आणि काळवीट यांच्या सोबत असणारी दुर्गा अशी शिल्पे या मंडपात आहेत .

Lighthouse
Lighthouse

दीपगृह – आकृती ५. महाबलीपुरम मध्ये फिरताना सतत दिसणारी वास्तू म्हणजे दीपगृह. तिथल्याच दगडांनी बांधल्यामुळे दीपगृह अनेक शतके जुन्या लेण्यांमध्ये अगदी मिसळून गेले आहे. या दीपगृहात प्रवेश आहे. आम्ही गेलो तेव्हा बऱ्याच शाळांच्या सहली आलेल्या असल्यामुळे बरीच गर्दी होती. मात्र तरीही आम्ही जाऊन आलोच. वरून गावाचे आणि समुद्राचे दृश्य फार छान दिसते. दिपगृहाच्या जवळच एक झाडाखाली बसून आम्ही दुपारचे जेवण केले. डिसेंबर असल्याने गुळाच्या पोळ्या करून आणल्या होत्या
घरातून त्याच खाऊन घेतल्या.

Lighthouse

ओलक्कनीस्वरा – आकृती ६. दीपगृहातून दिसणारे हे देऊळ एका दगडावर आहे आणि त्या दगडाच्या पोटात आणखी शिल्पे आहेत. देवळाच्या बाजूने दिसणारे दीपगृह आपण इथे पाहू शकते. देवळाच्या भिंतीवर रावण शंकराचे निवास स्थान असलेला कैलास पर्वत हलवायचा प्रयत्न करत असलेले शिल्प आहे. तिथे जागा फार कमी असल्यामुळे छायाचित्र घेण्यात अडचण आहे.

Olakkaniswara

महिषासुरमर्दिनी आणि शेषशायी विष्णू – आकृती ७. ओलक्कनीस्वरा देवळाच्या खाली एकमेकांसमोर दोन शिल्पे आहेत. दोन्ही शिल्पे सुस्थितीत आहेत. शेषाच्या फण्याच्या छायेत विष्णू पहुडलेला आहे आणि आणखी आकृत्या त्याच्या भोवती आहेत. समोरील शिल्पात अष्टभुजा महिषासुरमर्दिनी आणि महिषासुर यांचे युद्ध दिसते. महिषासुराचे तोंड आणि हातातील शास्त्र रेखीव आहेत. देवी भोवतीचे लोक अतिशय उत्साहाने युद्धात सहभागी होत असल्याचे दिसत आहेत. या टेकडीच्या आजूबाजूला दगडाच्या शोभेच्या वस्तू विकणारी अनेक दुकाने आहेत. काही कारागीर स्वतः काम करत असल्याचेही इथे पाहायला मिळते.

Shore Temple
Shore Temple

शोअर टेम्पल – आकृती ८. शोअर टेम्पल – बस स्थानकापासून चालायच्या अंतरावर पूर्वेला समुद्राच्या किनाऱ्यावर हे एक सुंदर देऊळ आहे. किनाऱ्यावर असल्यामुळे दुकानांची गर्दी खूप होती आणि बाकीच्या ठिकाणांपेक्षा या देवळाच्या परिसरातही गर्दी होती. इथल्या देवळाची जरा पडझड झालेली दिसते.

देवळासमोर एक मोठा तलावही खोदलेला आहे. नंदीच्या अनेक मूर्ती या देवळाच्या वाटल्या मांडून ठेवलेल्या आहेत. देवळाला लागूनच किनारा आहे . संध्याकाळी आम्ही निवांतपणे किनाऱ्यावर जाऊन पाण्यात पाय बुडवून आलो. किनाऱ्यावरून दक्षिणेला बघितले असता कल्पक्कम आण्विक ऊर्जा प्रकल्पाचे उंच कूलिंग टॉवर्स आपल्या नजरेस पडतात.

पश्चिम किनारी प्रदेशात राहत असल्यामुळे समुद्रावर संध्याकाळी सूर्यास्त बघायची सवय असलेल्या आमच्या डोळ्यांना त्या संध्याकाळी क्षितिज जरा रिकामाच भासत होता.

चेन्नई किंवा पॉंडिचेरी (१०० किमी) येथे गेले असता एक संपूर्ण दिवस या सुंदर ठिकाणी जरूर काढावा असाच हा परिसर आहे. राहण्याची आणि खाण्याची सोय असलेली अनेक ठिकाणे दिसली त्यामुळे २-३ दिवस निवांत राहण्यासही इथे काही मुश्किल आहे असे वाटले नाही.

उनाडक्या करताना :

थोर नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी लिहिलेली संगीत शाकुंतल मधील नांदी ‘पंचतुंड नररुंडमालधर’ ऐकताना मला प्रश्न पडला होता की हे पाच तोंडे असलेलं शंकराचं रूप कोणत? कधी पाहिलेलं नाही आपण कुठे. बरेच दिवस हा प्रश्न तसाच माझ्या मनात राहिला. नंतर मी घारापुरी येथील लेण्यांना भेट देत असताना म. के. ढवळीकर लिखित एक पुस्तिका वाचत असता लक्षात आले की घारापुरी येथील प्रसिद्ध त्रिमूर्ती म्हणजे केवळ शंकराची ३ रूपे दाखवणारी मूर्ती नसून मागच्या बाजूला चौथे रूपही
आहे आणि पाचवे रूप इतके विशाल आहे की ते पाहणे शक्य नाही, त्यामुळे दाखवण्याची शक्यता नाही.

महाबलीपुरमहुन परत आल्यावर माझाकडचे वेरूळ लेण्यांचे फोटो बघितले असता लक्षात आले की वराह, अष्टभुजा महिषासुरमर्दिनी, कैलास पर्वत हादरून सोडणार रावण ही शिल्पे वेरूळ येथेही आहेत. शिव-पार्वती यांचा विवाह दाखवणारे शिल्प (कल्याणसुंदर मूर्ती) घारापुरी आणि वेरूळ अशा दोन्ही ठिकाणी आहे.

उनाडक्या करताना जरा आणखी डोळे उघडे ठेऊन आणि आणखी खोलात जाऊन बघितले असता उनाडक्यांचा आनंद अशाप्रकारे आणखी वाढतो असा माझा अनुभव आहे.

– केदार भिडे.

संदर्भ (archive.org वर उपलब्ध )

  • Mahabalipuram, S. Sivaramamurti, Archeological Survey of India, 2004.
  • Elephanta, M. K. Dhavalikar, Archeological Survey of India, 2007.

NOTE :

COVID-19 Related Government Imposed Restrictions Prevail At A Few Locations.
For More Details Get In Touch With Us At [email protected] Or Call Us At +91-9420213309

Scheduled Tours :

Batch No.DateStarting PointOccupancy

Follow us on :

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like